अस्तित्व पटकथा भाग २९
फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,
दुसऱ्या दिवशी वरूण तो जथ्था कुठपर्यंत गेला आहे. याची तपासणी करण्यासाठी साधूंना ऍडमिट केलेल्या दवाखान्यात जातो. तिथे जखमी साधू असतात. वरूण फळे घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो. तो त्या पेशंट साधू जवळ जाऊन बसतो.
वरूण, “कशी आहे तब्येत आता.”
एक साधू, “देव कृपेने आहे बरी, डिस्चार्ज मिळेल थोड्या दिवसात. पण वाईट एकच वाटतं की आम्हाला कुंभ करता येणार नाही.”
वरूण , “तसं काही नाही तुम्हाला डिस्चार्ज मिळाला की खास गाडीने पाठवू. मुख्य दिवशी तरी पोहोचाल की.”
दुसरा साधू, “खूप उपकार होतील.”
वरूण , “ आपला जथ्था, कुठपर्यंत पोहोचला असेल.”
साधू , “असेल पंधरा-वीस किलोमीटर, नाशिकच्या दिशेने.”
वरूण, “ बरं काळजी घ्या येतो.”
साधू, “धन्यवाद.”
वरूण निघतो.
….. …… …..
दुसऱ्या दिवशी साधूंचा जथ्था एका नदीकाठी चालत आल्यावर, त्यातील एक महंत पुढे येतात. व आजचा मुक्काम इथे नदीकाठी करूया. उद्या पुढे प्रस्थान करू. सर्वजण नदीकाठी तळ ठोकतात. व भजन करू लागतात. काही भिक्षा मागून जवळील गावातून सिधा व आपल्याकडील शिल्लक शिधा एकत्र करून अन्न शिजवतात व खातात. भजन करू लागतात.
...................
वरूण गाडीतून आपल्या चौघा मित्रांसोबत निघालेला होता वाटेत जागोजागी जथ्यांची चौकशी करत तो पुणे विभागात येतो. तेथे नदीकिनारी पुलावरून जाताना त्यास जथ्था दिसला.
वरूणचा साथीदार पका, “ते बघ तिकडे पुलाखाली आहे.” वरूण गाडी साईडला घेतो.
वरुण, “कुठे आहे.”
भगवे झेंडे दिसतात. तो पुढे गाडी घेतो. थोड्या अंतरावर थांबून वरूण, “पका जाऊन जरा पाहुण बघा.”
पका जाऊन अंदाज घेतो. व परत येतो. गाडी शेजारी वरूण उभा आहे .
पका, “हो तोच जथ्था आहे.”
वरूण, “चला बसा गाडीत.”
थोडं पुढे गेल्यावर ती गाडी एका शेतवडीच्या रस्त्याला घालतात. तिथे गेल्यावर ते बिर्याणी काढून खातात.
पवन, “ बिर्याणी का खायची.”
पंखा, “ मग काय त्या साधूंचा वरण भात खाणार.”
पोटभर खाल्ल्यावर पाणी पितात. व जोराचा आळस देतात.
जीवा, “बिर्याणी मस्त होती.”
वरूण, “झालं ना आता, चला लागा कामाला.”
सम्या, “काय काम करायचं?”
वरूण, “काय म्हणजे सोंग काढायचं?”
सम्या, “कसल्ं?.”
जीवा, “शिमग्याचं, चल आडगं कुठलं?”
ते गाडीची डिक्की उघडून मागील बाजूने डिकीत असणाऱ्या वस्तू काढतात. वरूण पहिल्यांदा भगवी कपडे, नंतर कमंडलू, नंतर छडी, नंतर माळा, काढून देतो.
सम्या, “हे कशाला?”
वरूण, “चल दावतो कशाला ते?”
ते सर्वजण शेजारील उसात शिरतात. थोड्या वेळाने कपडे बदलून येतात.
जीवा, “हे साधू लोक कसे राहत असतील यात.”
पंखा, “कसं म्हणजे? सगळे राहतात तसं.”
सगळे चालताना….
वरूण, “अरे, एक काम राहिलं.”
सम्या, “काय राहिलं?”
वरूण , “पवण्या पुढील गाडीतील डबी आण.”
पवन पुढील बाजूस जातो व स्टेरिंग जवळील लॉकरमधून एक डब्बी आणतो. वरूण सगळ्यांना नाम ओढतो.
वरूण, “चला आता. अन.. पका तू गाडी जवळ थांब.”
ते अलख निरंजन करत त्या साधूंच्या जथ्थ्यात घुसले. तिथे साधूंच्या जवळ गेले. तेथे बसलेल्या साधूंपैकी एक जण
एक साधू, “नमस्कार आपण कुठून आला.गुरुवर्य. आपला परिचय, आपले नाव.”
वरुण, “ आम्हाला कडकनाथ महाराज म्हणतात. हे तीन आमचे शिष्य आहेत. भुंगी शिंगी व परनानंद.”
साधू, “ आपले दर्शन झाले, परमानंद प्राप्त झाला. बरं का, आम्ही आता भोजन सेवन करणार आहोत. तुम्ही पण या आमच्या अल्पोपहारात सामील व्हा.”
ककडनाथ, ( वरूण ) “अति आनंद झाला. चला…”
ते भोजनास बसतात.
थोड्याच वेळात एक साधू जेवणासाठी केळीची पाने वाढतो. त्यावर थोडा भात व डाळ जी अळणी असते, ती वाढली जाते.
साधू, “प्रभू, जेवण ग्रहण करा.”
ते जेवू लागतात. पहिला घास घेतात. त्यांना ते बेचव लागते.
जीवा, “हे साधू, काही खातच नाहीत का? कसलं हे जेवण अळणी केलंय.”
साधूच्या वेशातील सम्या, “नाहीतर काय? मी तर असलं जेवण खाल्लं, तर दोन दिवसात रोडका होईन.”
कडकनाथ ( वरूण), “गप्प बस, मगाशी खाल्लेस ना. गप नाटक कर. दोन चार घास खा. व गप्प बस.”
जीवा, “यासाठी साधूच कशाला व्हायला पाहिजे? दोन थप्पडा लगावल्या असत्या यांना, तर सगळं सांगितलं असतं.”
वरूण , “गप्प.”
त्यांची कुजबूज ऐकूण एक साधू तिथे येतो.
साधू, “काही हवं का महाराज?”
कडकनाथ, “नको, आम्ही फक्त एक घासच अन्न सेवन करतो. आमचं तेही झालेय. मी आपला ऋणी आहे.”
साधू , “जेवण छान होतं ना?”
कडकनाथ, “हो, खूपच छान, मस्त आम्ही आज पर्यंत असा आहारच केला नाही. अप्रतिम.”
साधू, “धन्य वाटलं, बरं मी जातो, भांडी घासायला हवी.”
तो गेल्यावर
जीवा, “जेवण कसं झाले म्हणे, हे काय जेवण म्हणायचं? ना चव ना ढव.”
कडकनाथ, “शांत रहा.”
थोड्या वेळाने झोपायची तयारी चालू होते.
एक साधू. आपली पथारी अंथरतो. व त्यावर झोपू लागतो.
साधू, “आपली पथारी”
कडकनाथ, “ ही धरतीच आमची पथारी व वरील निलांबर हेच आमचे पांघरूण आहे.”
साधू, “बरं, झोपूया आता. पहाटे प्रस्थान करायचे आहे.” वरूण व त्याचे साथीदार देखील तेथे झोपतात. झोपल्यावर अंथरुणावर.
वरूण , (त्या साधूस)
कडकनाथ, “ आम्ही असे ऐकले की आपल्या जथ्यास अपघात झाला होता.”
साधू, “हो झाला, एक श्रीमंताचा बिघडलेला मुलगा गाडी घेऊन घुसला होता. जथ्यात. चार - पाच जण जखमी झाले.”
वरूण, “अरेरे! वाईट झालं. ते लोक कुठे आहेत?”
साधू, “आहेत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत.”
वरूण , “त्यांच्या सेवेला कुणी नाही थांबलं.”
साधू, “आहेत दोघेजण.”
वरूण , “बरं… मी ऐकले की कुणा साधूने त्या मुलास दगड मारले.”
साधू , “छे छे, कोणी मारले नाही, पण आमच्यातील रोहितानंद महाराजांनी एक दगड मारला होता. खरा.”
वरूण, “कोण हे, रोहितानंद महाराज त्यांचे दर्शन घ्यावे म्हणतो.”
साधू, “ते बघा, त्या तिथे आहे.”
वरूण, “ते ध्यानस्थ बसलेले.”
साधू, “ हो.”
वरूण , “ते काय करत आहेत .”
साधू, “रोज झोपण्यापूर्वी ते साधना करतात.”
साधू झोपी जातो. थोड्याच वेळात तो घोरु लागल्यावर वरूण उठून रोहितानंद महाराजांजवळ गेला. तोपर्यंत ते ध्यानातून बाहेर आले होते.
वरूण त्याजवळ गेला.”
वरूण (कडकनाथ), “ नमस्कार स्वामी.”
साधू, “ नमस्कार.”
वरूण, “मी असं ऐकले आहे, की आपणास सिद्धी प्राप्त झाली आहे.”
साधू, “असं काही नाही.”
वरूण , “नाही मी असे ऐकले. की आपण हवेतून दगड प्रकट करू शकता, काही दिवसापूर्वी या जथ्थ्यामध्ये घुसलेल्या एका विकृत मुलाला आपण त्याच्या गाडीवर एक मोठा हवेतून दगड प्रकट करून मारला.”
साधू, “ तसे काही नाही. तो दगड माझ्याकडे होता. जेव्हा कोकण प्रांताहुन देश प्रांतावर आलो, तेव्हा वाटेत एका गावी मुक्काम केला होता. त्या ठिकाणी आम्हाला हा दगड मिळाला होता.”
वरूण, “असं आहे होय, म्हणजे मी ऐकली ती अफवा होती म्हणा. मला वाटलं आपणास सिद्धी प्राप्त आहे.”
साधू, “तसं काही नाही. मी चार वर्ष झाले संन्यास घेऊन व सिध्दीच म्हणाल, तर ती मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो.”
वरूण , “माफ करा. मी तुमचा वेळ घेतला.”
साधू, “त्यात काय शंका निरसन झाली. यात सगळं आलं.”
वरूण , “बरं आपण निद्राधीन व्हा.”
साधू, “ हो.”
वरूण , “खूप वेळ झाला. आम्ही पण निद्रा घेतो.”
वरूण तिथून निघतो. आपल्या जागी येतो. मध्यरात्री ते सर्व झोपल्यावर तिथून निघून आपल्या गाडी जवळ ते येतात व निघतात.”
…….. …..,. ……..
क्रमशः पुढे.......