सोमवार, ११ मे, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १२

 

अस्तित्व पटकथा भाग १२ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

दुपारची वेळ मल्हारी गाडीवरून आसगावच्या हद्दीत रस्त्याने पुजारी काकांना घेऊन निघालेला होता. वाटेत पुजारी बुवांना लघुशंका आली म्हणून त्याने बुलेट थांबवली. पुजारी काका बाजूला उतरून रानात गेले. इतक्यात एक रस्त्याच्या बाजूच्या मोकळ्या शेतात मुले चिन्नी दांडू खेळ खेळत होती. पाटलाची उमा एका लहान मुलास चिन्नी कशी मारायची ते शिकवत होती.

उमा , “ये वेड्या बघ कशी चिन्नी मारायचं ते. साधी चिन्नी मारता येत नाही. नेमबाज कसा व्हायचचास. थांब मी दाखवते.”

तिने दांडू काढून घेतला व चिन्नी मारली. ती बुलेट वरून निघालेल्या व वाटेत पुजारी काकांना लघुशंका आली म्हणून थांबलेल्या मल्हारीस लागली.गेली,

 मल्हारी, “आई ग.”

 इतक्यात चिन्नी पकडायला गेलेल पोर, “अरे , पळा पळा, चिन्नी लागली वाटतं.”

 उमा, “ बापरे, हे काय झालं. पळालेल बर नाहीतर काही धडगत नाही.”

मल्हारी, “ ये, थांब.”

मल्हारीने डोक्यावर लागलेल्या ठिकाणी रुमाल लावला.

उमाने पळताना मागे वळून पाहिले. मल्हारी व तिची नजरा नजर झाली. ती व मुले पळून गेली. पुजारी लघुशंका करुन आले.

पुजारी, “अरे रे, चिन्नी लागली वाटतं.”

मल्हारी , “जास्त नाही, थोडी लागली.”

पुजारी, “नाही कसं रक्त आलेय. चल शामभट्टाकडे गेल्यावर पाहू.”

 ते गावात आले. देवळा जवळील घरात शाम भट्टांकडे आल्यावर.

पुजारी व मल्हारी घरात गेले.

शाम भट्ट, “अरे, काय लागलं.”

पुजारी, “वाटेत मुले खेळत होती. चिन्नी लागली.”

शाम भट्ट, “ ही मुले पण ना, गावात गोंधळ घालून देवळाजवळ खेळून खापर्या घराच्या व देवळाच्या फोडतात. म्हणून रानात पिटाळली तर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची डोकी फोडत आहेत.”

श्याम भट्ट, “ अगं, जरा हळद आण.”

मल्हारी, “ नको कशाला, जास्त लागलं नाही.”

श्याम भट्ट, “ नाही कसं, रक्त ओघळत आहे. थांब…”

श्याम भट्टांची पत्नी हळद घेऊन आली. ती कपाळावर थोडी लावली. चहा पाणी झालं

मधुकर पुजारी, “ चार दिवसापूर्वी पाहिलेल्या मुलीच्या स्थळाच काय झालं.”

 श्याम भट्ट, “ आहे की थांबा आधी कल्पना देऊन येतो.”

श्यामभट्ट पाटलाच्या वाड्यावर गेले.

श्यामभट्ट , “ पाटील आहेत का?”

आतील खोलीतून पाटील व शकुंतला व आजी बाहेरील ज्योत्यावर आलीत.

गणपतराव, “ बोला, श्याम भट्ट, काय म्हणताय.”

श्याम भट्ट, “ अहो परवा बोललो होतो ना एका स्थळाबद्दल मंदिरात.”

 गणपतराव, “ काय झालं त्याचे.”

 श्याम भट्ट, “ तो मुलगा आलाय पहायला.”

गणपतराव, “ काय अचानक.”

 श्यामभट्ट, “ अहो, कालच तुम्ही म्हणाला होता ना, चालेल म्हणून.”

गणपतराव, “ बर, बोलवा त्यांना.”

 गणपतराव, ( शकुंतलास) “ अहो , उमा कुठाय?”

 शकुंतला, “असेल इथेच कुठेतरी.”

आजी, “ एवढी काय घाई लागलेय पोरीला द्यायची. अजून लहान आहे ती.”

शकुंतला, “ गप्प बसा, तिच्या बरोबरीच्या मुलींची लग्न होऊन संसाराला लागल्या त्या. “

आजी, “ आणखी एक दोन वर्षे राहिली असती.”

 शकुंतला, “ तिचं काय लोणचं घालायचं आहे.”

श्याम भट्ट, “काय सांगू?”

गणपतराव शकुंतलाकडे पहात.

शकुंतला, “थोड्या वेळानं घेऊन या. तयारी करते.”

 गणपतरावांनी नजरेने इशारा केला.

शकुंतला आपल्या लहान मुलास

शकुंतला, “ बाळ जा, उमा ताई कुठे असेल तिथून बोलावून आण.”

तो धावत रानाकडे गेला. मुले एका झाडाखाली बसली होती. उमा झाडास उभा होती.

महादेव, “ कशाला एवढ्या जोरात मारलीस डोचकं फुटलं नव्ह त्याचं.”

उमा, “ मला काय माहित त्याला लागेल ते?”

महादेव, “ हा शिरप्या काय खोट सांगतोय व्हय.”

शिरपा, ( उठून) “ तर कसली जापून लागली, रगात आलं बिचाऱ्याला.”

उमा, “ लई लागली व्हय रं.”

शिरपा, “ तर काय एवढी खोप पडली, रक्तं गळंल भळभळा. माहिताय का?”

उमा, “ खरंच, देवा वाचव रे.”

 अथर्व, “ उगाच, शिरपा काय पण सांगू नको, तुझं माहिताय आम्हाला हातभर लाकूड अन सहा हात ढलपी असते. “ “गप ग, उगाच टेन्शन घेऊ नको. जर वेळ आली. तर मी अंगावर घेईन तुझा आरोप.”

शिरपा, “ म्हणं मी घेईन, लेका दांडू तरी धरायला येतो का”

महादेव, “ये गप्प आता, उगाच कालवा नको. काही झालं तरी आपल्या उमक्काला वाचवलं पाहिजे. तिचे किती उपकार आहेत आपल्यावर, किती पेरु, बोरं, कटक्या, चांगुण्या तीनं दिल्यात. गाभुळल्या चिंचा तर कितीतरी वेळा काढून दिल्यात तिनं.”

मुले, “ होय, खरं हाय.”

इतक्यात उमाचा भाऊ तिथे ओरडत पळत आला. धापा टाकत

भाऊ सुशांत, “ उमाक्का , उमाक्का”

महादू, “ काय झालं रे एवढं पळायाला. कुत्रा माग लागलाय का?”

सुशांत, “ उमाक्काला आईनं बोलावलय. अर्जंट काम हाय.”

शिरपा, “ शकुंतला काकीनी बोलावलंय म्हणजे झालं. वाड्यावर बातमी पोचली वाटत.”

उमा कावरी बावरी झाली.

महादू, “ वेळ आली तर मी सांगतो. मी मारली इटी म्हणून.”

शिरपा, “ पण त्याने विटी मारताना पाहिलंय ना तिला?”

महादेव, “ बघू चल काय झालंय ते, सगळ्या खेळाचा सत्यानाश झाला.”

तोपर्यंत आणखी एक मुलगा धावत आला.

मुलगा, “ ताई, ताई चल बोलावलंय तुला.”

 उमा लगेच घरला निघाली. पाठीमागून मुले चालली. वाटेत त्यांना तिने थांबायला सांगितलं. तरी देखील ते तिच्यामागे निघाले. दबक्या पावलांनी उमा परस दाराने ती आत घरात आली. मुले थोड्या अंतरावर उभा राहिली. शकुंतलाने त्यांना स्वयंपाक खोलीच्या खिडकीतून पाहिले.

शकुंतला, “आली वानर टोळी.”

 दरवाजाजवळ जात उमास..

 शकुंतला, “ झालं उंदरा सारखं उंडारुन, मग हात पाय धू. अन् नेस ती साडी.”

शकुंतला मुकाटपणे साडी उचलून. व आतील दालनात गेली. मुले तिथे येऊ लागल्यावर.

शकुंतला, “ थांबा तिथंच, तुमच काय काम, बसा तिकडे ओट्यावर. नंतर बघते तुम्हाला.”

ती मुले शांतपणे ओट्यावर एकमेकाकडे पहात बसली. श्यामभट्ट व मधुकर पुजारी अन् मल्हारी वाड्यात पुढील दराने आले. आत येताना वाडा बारकाईने न्याहाळत मल्हारी आत आला.

क्रमशः पुढे........


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा