अस्तित्व पटकथा भाग १५
अस्तित्व पटकथा भाग १५ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,
क्रमशः पुढे चालू....
उमा बागेतील झाडाखाली बसली होती. शांतपणे विचार करत. तेथील शांततेने तिच्या अंतरंगात वेगळीच हालचाल जाणवत होती. तशी ती झाडाला टेकून बसली. तर वेगळीच शक्ती तिच्यामध्ये जागृत होत होती. व तिचा अल्लड स्वभाव शांत होत चाललेला होता. ती एकाग्र होत होती. इतक्यात पाठीमागून लपत छापत आलेला महादू तिला ‘भाव’ केला.
महादू, “घाबरली रे घाबरली.”
उमा, “ तुला वाटते का मी घाबरले असं.”
महादू, “ नाही.”
उमा, “ मग असं का म्हणालास?”
महादू, “ बर बाई, मी हरलो. एक सांग. तुला दाजीबा पसंत आहेत नव्ह.”
झाडावरून लोंबकलणारा व कैऱ्या तोडणारा अथर्व खाली येत म्हणाला, “ पसंत नसायला काय झालं. मस्त आहे. राजबिंडा, बुलेट चालवताना एखाद्या हिरो सारखा दिसतो.”
उमा, “तुला बरे माहिती, तू केव्हा पाहिलास.”
अथर्व, “ तू विटी मारलीस ना, तेव्हा पाहिलं. काय ती बुलेट, काय तो गॉगल, एकदम झ्याक दिसत होता.”
शिरपा, “ पण उमाक्का तुला कशी पसंत केली तेनं.”
उमा, “म्हणजे? मी काय वाईट दिसते.”
शिरपा, “ एवढी विटी मारुन देखिल गडी शांतच कसा हा मला प्रश्न पडलाय बघ.”
महादू, “पसंत नसायाला काय झालं. आमची उमाक्का आहेच एका राजकुमारी सारखी. एखाद्या राजाला देखिल गुलाम बनविल.”
अथर्व, “काय ग, तू दाजीबाला गुलाम करणार?”
महादू, “गप्प लेका, तस म्हणायचं असतं. अस का कोण नवऱ्याला गुलाम करत होय.”
उमाच्या चेहऱ्यापुढे चहा देतानाचा मल्हारचा पाहिलेला चेहरा दिसू लागला.
….. ….. …..
उमाच्या लग्नाची बातमी गावात सर्वत्र पसरली. जगन पारावर बसलेला होता. तेथे गावातील दोन माणसे गप्पा मारत होती.
गोपाळ, “ काय सावजी पेरणीची तयारी कुठंपातूर आली.”
सावजी, “ आलीय आवरत, काल धाणनी, औत झालंय. आलय तयार होतं.”
धनाजी, “ गोपाळकाकानी नंबर मारलाय म्हणायचा.”
गोपाळ, “ केलंय तयार पण गावाबरोबरच टोकणनी करायची ठरलंय.”
इतक्यात तेथून श्याम भट्ट जाताना पाहून.
गोपाळराव, “ काय बुवा कसली गडबड चाललीय.”
श्याम भट्ट, “ पाटलाच्या उमाला स्थळ आलंय नव्हं. त्याच सारख वारख करायच चाललय.”
धनाजी, “ पाटलाची उमा लग्नाजोगी झाली.”
सावजी, “ मग काय, तिच्या बरोबरीच्या सर्व उजवल्या. हीच तेवढी राहिलीय.”
धनाजी, “ कुठलं स्थळ आलंय?”
श्याम भट्ट, “ सूर्यगावच्या सदाशिव पाटलांचा मुलगा मल्हारी. त्याच आलंय. पसंती झालीय. थोडीफार बोलणी करायची अन् उरकून टाकायचं.”
सावजी, “बर हाय की.”
श्याम भट्ट, “ येतो मग.”
गोपाळराव, “ हा चालेल.”
पारावर बसलेला जगन त्याचं बोलणं ऐकतो. तो आपल्या मनात….
जगन, ( मनात) “ उमीच लगीन काय? बघतोच कशी लग्न करते ते.”
तो तिथून उठला. व शंभू माळ्याच्या घरी गेला. शंभू माळी ओसरीतल्या पाळण्यावर बसलेला होता.
जगन, “ राम, राम, माळी काका.”
शंभू माळी, “ कोण जगन, ये… ये… बस. काय काम काढलस.”
जगन, “ काय काका, नाही म्हटलं तर तुमच्या कानावर बातमी आलीच असेल की.”
शंभू माळी, “ बातमी, ती आणि कोणती?”
जगन, “ अहो, ती नाही का गणपत पाटलाची पोरगी उमी. तिचं लगीन ठरतंय म्हणे.”
शंभू माळी, “ काय? उमीचं लगीन, ते अन् कुणाशी?”
जगन, “ आव ते सुर्यगावचं आहे ना पोरग. कोण ते हा मल्हारी की फिल्लारी हाय., हा त्याच्याशी ठरतंय._
शंभू माळी, “मग ठरू दे की, त्यात काय एवढं, वयात आलेल्या पोरी उजवून इकडून तिकडं अन् तिकडून इकडं जायच्याच.”
जगन, “अहो काका, तिनं एवढं तुमच्या बागेचं नुकसान केलं, अन् तुम्ही तिला अशी सोडणार.”
शंभू माळी, “ मग काय करायचं म्हणतोस.”
जगन, “ हा कान करा इकडं.”
जगन शंभू माळ्याच्या कानात कुजबुजत.
शंभू माळी, “अस म्हणतोस.”
जगन, “ पण त्यासाठी खर्चापाणी लागलं, मग देताय ना, पाचशे रुपये.”
शंभू माळी, “ बर… देऊया की, माझ्या आंब्याच्या झाडाच्या एका एका आंब्याचा बदला घ्यायचाय मला. हा थांब.”
शंभू माळी उठला. त्याने आपले फडताळ उघडून त्यातील डब्यातून शंभर रुपयांच्या पाच नोटा काढून जगनला दिल्या. जगन पैसे घेऊन निघून गेला.
जगन जातच शंभू माळ्याची बायको आतून बाहेर आली.
शंभू माळी बायको, “काय हो, तो जगन्या कशाला आला होता?”
शंभू माळी, “ आलता काम होतं एक.”
बायको, “ मला माहिताय कसलं काम ते. उगाच चढता वेल कापू नका. नाहीतर आपला कुजल. हा सांगते. उगाच नसत्या उठाठेवी कशाला हव्यात. जर त्या पाटलाला अन् पाटलीनीला कळलं तर तो पाटील टांगेल आसगावच्या वेशीच्या बावीवर, अन् पाटलीन देईल मिरचीची धुरी मग समजल.”
शंभू माळी, “कळेल तेव्हा कळेल, तू तेवढी गप्प रहा म्हणजे झालं. बघतोच मी, माझं आंबे उतरते काय. चढ म्हणावं झाडावर, अन् खा आंबे.”
……………. ……… ………..
जगन आंतरदेशीय पत्र घेऊन त्यामध्ये उमेविरूद काही बाई लिहून घेऊन सूर्यगावला सायकल घेऊन गेला. वाड्याच्या बाहेर अंगणात शिवण्णा नोकर लाकडे फोडत होता. जगन पोस्टमन होऊन तिथे गेला.
जगन, “ पोस्टमन, पत्र घ्या.”
शिवण्णाने लाकडे फोडायची थांबवून पत्र घेतले. व आत नेऊन थोरल्या सुनेच्या हातात दिले.
शिवण्णा, “बाईसाब हे घ्या पत्र आलंय कुणाच?”
पार्वतीने पत्र घेतले. व ती जेवण खोलीत आली. सरस्वती तिथे भाजी नीट करत होती.
सरस्वती, “कुणाच ग पत्र.”
पार्वती, “ अगं, बाई यावर तर पत्ता दिसत नाही. फक्त मल्हारीस अस लिहिलंय.”
सरस्वती, “ आण बघू, काय लिहिलंय बघू.”
“ अग खरंच की असं नाव लिहिलंय म्हंटल्यावर काहीतरी भानगडच असणार.”
पार्वती, “ कसली भानगड?”
सरस्वती, “ थांब , फोडून बघते.”
सरस्वती पत्र फोडून वाचले. व आवाक होऊन.
पार्वती, “काय हाय ग पत्रात.”
तिने तिच्या हातातील पत्र घेऊन वाचले.
पार्वती, “ चल, मस्त संधी आलेय. जाऊन सांगूया.”
सरस्वती, “थांब, आता नको, बरोबर मोक्यावर घाव घालायचा.”
पार्वती, “ म्हणजे?”
सरस्वती, “ म्हणजे वाघाचे पंजे, कान कर इकडे.”
तीने तिच्या कानात काहीतरी सांगितले.
……… ……….. …………