सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ३१

 अस्तित्व पटकथा भाग ३१



फिल्म स्क्रिप्ट,मराठी पटकथा,स्टोरी,marathi film,story,



सूर्यगाव सकाळचे दहा वाजले. गावाबाहेरील मंदिराच्या प्रांगणात भव्यसभा आयोजित केलेली आहे. मल्हारी त्याचे भाऊ व गावकरी गावातील पंच सर्व बसलेले आहेत. उमा देखील आलेली आहे. तेथे बॉसचा मुलगा जयेश व वरूण आपल्या अनेक गुंडा समवेत आलेला आहे गावातील लोकांसमोर वरूण.

 वरूण, “ हे पहा आजूबाजूच्या गावातील लोकांनी या उत्खननास परवानगी दिली आहे. व तेथे कामाला सुरुवात देखील झाली आहे. गावातील लोकांना आलिशान फ्लॅट व 20-20 लाख प्रत्येकी दिले आहेत. या योजनेत सहभागी व्हा व आपल्या मुलांचं कल्याण करा. चार चाकी गाडीतून फिराल बघा.”

 एक गावकरी, “गाडीतून फिरवून व फ्लॅटमध्ये राहून पोटाला काय खावावं.”

 वरूण, “हे बघा, तुम्हाला काम देऊ. दररोज आम्हाला इथे मजुरांची आवश्यकता असतेच.”

 मल्हारी, “आम्ही सध्या इथे मालक आहोत व तू आम्हाला गुलामीचे स्वप्न दाखवतोस. गावकऱ्यांनो काही ऐकू नका याचं. आपली ही उपजावू जमीन एकदा का याच्या घशात गेली, की आपल संपलं. हे आता तुम्हाला काम देणार. नंतर खाणीतील धातू संपले की काय असेल भविष्य, वैराण, ओसाड माळ. जो पिके घेण्यास अनुपयुक्त असेल. आज येथील जमीन उपजावू आहे. जी दोन वेळची भाकर आपल्याला देते. खाणकाम करून त्यामधील जीवित्व काढून घेतल्यावर येथे काय येणार?”

 प्रतापराव, “आपल्याला माहित आहे, जिथे खाणकाम होते. त्या प्रदेशातील सर्व सृष्टी निर्जन ओसाड बनते. व एकदा का खाणीतील धातू संपला. की इकडे कोणाचेही लक्ष नसते. व आपली मुलेबाळे भीक मागत फिरतील का?”

 जयसिंगराव, “ते काही नाही आपलं भविष्य, आपल्या हाती. आम्हाला आमची जमीन द्यायची नाही.”

 सर्व गावकरी एकत्रित विरोध करतात. वरून व जयेश तेथून माघारी फिरतात. ऑफिसमध्ये बॉस बसलेला आहे. त्या शेजारी काही कर्मचारी, जयेश, वरूण, प्रभाकरन व काही गुंड आहेत.

 वरूण, “गावातून कडवा विरोध आहे. आम्ही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण गावातील लोकांनी काहीच ऐकले नाही.”

 बॉस, “गावची लोक साधी असतात. त्यांना गोड बोलून आपल्या बाजूला वळवायचं असतं. ज्याप्रमाणे दारूत बर्फ घोळवतो. तसं…”

 जयेश, “गावातील लोक साधीच आहेत. पण ते तिघे अतिशय हुशार वाटले, कडवा विरोध करणारे.”

 बॉस, “जे आपल्या विरुद्ध जातात. त्यांना अवचित बाजूला करता आलं पाहिजे.”

 वरूण, “इतकं सोपं नाहीये. साम, दाम दाखवून पाहिलय आम्ही.”

 बॉस, “तुम्ही पोरकट आहात. आता मी पहा कशी खेळी करतो ते?”

 बॉस बेल वाजवतो. शिपाई आत मध्ये येतो.

 शिपाई, “बोला साहेब,”

 बॉस, “हे बघ, सरोजा बाईंना बोलव.”

 शिपाई जातो. सरोजाबाईंना बोलवायला त्यांच्या केबिनमध्ये जातो. सरोजा बाई त्याच्या केबिनमध्ये ते दिसायला अत्यंत सुरेख व बुद्धीने अत्यंत बिलंदर बाई, तिला बोलावले जाते. ती आपल्या ताठ स्वभावात कॅटवॉक करत त्या रूम मध्ये दाखल होते. रूमचे दार उघडून.

सरोजा, “सर बोलावलंत.”

  बॉस, “हो एक काम होतं.”

सरोजा, “बोला कोणतं काम होतं.”

 बॉस, “होते एक महत्त्वाचं.”

 सरोजा, “बोला बॉस.”

 बॉस, “एका गावातील जमीन नावावर करून घ्यायचे आहे.”

 सरोजा, “एवढेच ना, मग झालं समजा.”

 बॉस, “वरूण सर्व काही माहिती मॅडमला द्या.”

 वरूण, “जी सर.”

 सकाळचे साडेदहा वाजले. सूर्यगावात एक कार व त्या पाठोपाठ चार ट्रक हजर होतात. गावात गाडी थांबल्यावर सुंदर तरुणी गाडीतून खाली उतरताना तिला पाहून गावकरी नादीष्ट वृत्तीने त्याजवळ जाऊन.

 एक गावकरी, “कोण बाई तु, कुणाकडे पाहुणी आलिय.” स्त्री, “मी सरकारी अधिकारी आहे, गावातील लोकांना शेतीची अवजारे व शेगडी वाटपासाठी आलेय व ज्याच्या नावावर सातबारा त्यालाच मिळेल सरकारी लाभ.”

 दुसरा गावकरी, “काय काय मिळेल बाई?”

संयोजा, “काय काय म्हणजे घरगुती व शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू.”

 गावात एकच गोंधळ उडतो. जो तो येऊन आपलं नाव नोंदवून, अंगठा करून साहित्य घेऊन जाऊ लागतो. सुंदर मुलीच्या हातून वस्तू घेताना, जो तो कामातूर झालेला असतो. त्या दिवशी शेतात कामाला माणसे घेऊन मल्हारी गेलेला असतो. व त्याचे भाऊ काही धान्याच्या सौदा करण्यासाठी मंडीत गेलेले होते. त्यावेळी आपल्याला पण साहित्य मिळावे. या आशेने एक गावातील मुलगा गावातून मल्हारीच्या शेताला येतो. ज्या ठिकाणी त्याचे आई व बाबा शेतकामाला आलेले होते. शेतातील काम चालू होते.

एक स्त्री शेवंता, “ ऊन लई वाढायला लागलय ग. वाईच थोडा विसावा घेऊया की.”

 हरी, “एवढी पात लावू आणि बसू घटकाभर.”

 भांगलन करून थोडा वेळ पाणी प्यायला झाडाखाली विसावली होती. इतक्यात गावातून धावत हरीचा मुलगा शेतात आला. सुरज , “आई-बाबा” असे ओरडत शेतात आला. त्याला धावत येताना पाहून

 शेवंता, “ काय झालं, एवढा गडबडीने का आलायस?”

 सुरज, “आई, गावात सरकारी माणसं आल्यात व सगळ्यांना शेतीची अवजारे व शेगडी वाटप करत आहेत. ते बी फुकट.”

 आई, “ काय म्हणतोस?”

 मल्हारी, “फुकट की काय? कधी फुकट कोण देतो होय.” मुलगा, “होय, चालू आहे.”

 शेवंता व हरि आम्ही लगेच जाऊन येतो.

 मल्हारी, “ अन् कामाचं.”

 शेवंता, “लगेच येतो,”

हरी, “ चला रे.”

 तेव्हा सगळेच गावाकडे निघतात.

 मल्हारी, “फुकटच गावलं, अन् बापलेक धावलं, काय माहित काय सरकार करील आणि काय नाही.”

 सर्वजण साहित्य घेण्यासाठी एकच गर्दी करतात.

…… ….. ……


 पुढील प्रसंग

 सर्वजण ऑफिस मध्ये बसलेले होते इतक्यात तिथे सरोजा आली.

 बॉस , “सरोजा कामाचं काय झालं?”

 दुसरा कर्मचारी, “ सरोजा म्याडम अन् काम होणार नाही असं कधी घडलय का ?”

 सरोजा, “हीच तर माझी खासियत आहे.”

 सरोजा फाईल पुढे करते.

सरोजा, “ हा सर, ही घ्या फाईल. यामध्ये गावातील 60 टक्के लोकांची सहमती आहे.”

 बॉस, “ आणि बाकीचे.”

 सरोजा, “ते तुम्ही बघा, कारण त्या स्कीम मध्ये सापडलेले जेवढे शेती असणारे नग होते ना, त्यांचे आंगठे व सह्या मिळाल्या.”

बॉस, “यांने काम होईल.”

 दुसरा कर्मचारी, “का नाही, बहुमत तर मिळाले ना.”

बॉस , “ठीक आहे, पण केलंस कसं?”

 सरोजा, “ शांत राहून, थंड डोक्याने, शत्रूच्या कमजोरीचा फायदा घ्यायचा म्हणजे आपलं काम होतं.”

 बॉस, “ म्हणजे कायदेशीर वाट मोकळी झाली म्हणा.”

 सरोजा, “ कायदेशीर वाट झाली, पण वास्तविक प्रॅक्टिकली अवघड असणार.”

 बॉस, “त्यासाठी आपले गार्ड आहेत की.”

.......... ............ .......

काही दिवसांनी सूर्यगावात सकाळच्या वेळी काही मशिनरी दाखल झाल्या. त्या शेजारील रस्त्यावरून डोंगराकडे निघाल्या. त्या गावाचा डोंगर उकरुन त्याच्या गाभ्यात असणारे अनमोल खनिज काढण्यासाठी घेऊन जाण्यात आल्या होत्या. त्या मशनरीच्या घरघरण्याने गावची शांतता भंग पावत होती. थोड्याच वेळात गावातील मध्यभागी असणाऱ्या मंदिरातील घंटा घन घनू लागली. जो तो घरातील काम टाकून मंदिराकडे जात होता. गावातील पोरेसोरे आबाल वृद्ध जमा झाले होते. तेथे गेल्यावर गावकऱ्यांनी पाहिले. गावातील भिवा घंटा वाजवत होता. मल्हारी व त्याचे भाऊ देखील तेथे हजर झाले होते. मल्हारी, “भीवांन्ना का बेल वाजवतो आहेस? काय झाले व तुझ्या डोक्याला काय लागलया.”

 तशी गावात लोंकात कुजबुज चालू झाली.

भिवा पाटील, “आपण फसलो.”

 प्रतापराव, “नीट काय ते सांगशील का?”

 भिवा, “ साहेब सकाळी वैरणीला गावमिरीच्या रानात गेलतो. तर तिथे खाणकाम चालू होतं. मी त्यांना हटकले.”

दृश्य :

 भिवा, “काय रे, कोण तुम्ही माझ्या रानात काय चाललंय. व्हा बाहेर,”

तेव्हा ते

कर्मचारी, “ तुझं रान कुठलं? आता हे सरकारी मालकीचा आहे व सरकारने आमच्या ताब्यात दिलेय.”

 भिवा, “सरकारनी, आमच्या परवानगीशिवाय, सरकार कसं काही करू शकतं.”

 कर्मचारी, “परवानगी तर कधीच मिळाली.”

 भिवा, “ कोणी दिली.”

 कर्मचारी, “ तुझ्या गावकऱ्यांनी.”

 भिवा, “ नाही, तशी आम्ही कोणतीच परवानगी दिली नाही.”

 कर्मचारी, “ हा बघ हा कागद यावरील सह्या.”

 भिवा, “बघू…”

 भीवाने तो कागद हातात घेतला. व अत्यंत बारकाईने तो निरखला. त्यावर सूर्य गावाच्या लोकांचे उत्खननास परवानगी असल्याचे नमूद होते.

 भिवा, “ हा कागद खोटा आहे. आम्ही कुठलीच परवानगी दिली नाही.”

 कर्मचारी, “मग जा कोर्टात आणि घे जमीन.”

 भिवा, “ सोडतोय का? पहिल्यांदा माझ्या रानातून बाहेर व्हा.”

 कर्मचारी, “कुठलं रान,तुझं?”

तेव्हा त्यांच्याशी त्याची जोरात बाचाबाची झाली. व त्याला जोराचा चोर दिला.

…… ……………

 देवळाच्या दारात भिवा रडत होता. मल्हारी व गावाची पंचमंडळी त्याच्याजवळ गेली व त्याचे सांत्वन करून त्यास म्हणाले.

 मल्हारी, “भिवा, रडू नकोस. बघूया त्यांच्याकडे.”

 पंच, “बघूया, बघूया म्हणायला. ते गुंड लोक, त्यांचे हात वर पोहोचलेले. त्यांच्याशी कसं झुंजायचं.”

 दुसरी व्यक्ती, “ डोक्यात राग घालून नाही. शांततेने हा लढा लढायला हवा. आधी त्यांना परवानगी कशी मिळाली ते तर बघायला हवं.”

 मल्हारी, “पण आमच्या गावात येऊन आम्हावरच दांडगाई. आसमान दाखवू त्यांना.”

त्यांनाराव, “ असं रागात काय पण करून चालणार नाही. आपण वकिलाकडून नोटीस देऊ. व थांबवू हे काम.”

 मल्हारी, “ तुम्ही बघा वकिलाच, आम्ही आमचे पैतरे वापरतो.”

 जयसिंगराव, “ हे बघ मल्हारी विचारपूर्वक करायला हवं. सगळं.”

 मल्हारी व प्रतापराव गावातील वकील संदीप शिवचरण, वकील जे शहरात आहेत. त्यांची भेट घ्यायला गेले. शहरातील न्यायालयाबाहेर असणाऱ्या वकिलांच्या सज्जा मधील संदीप शिवचरण वकिलाकडे गावातील लोकांना घेऊन प्रतापराव गेले. ऑफिसमध्ये वकील शिवचरण बसून एका प्रॉपर्टीच्या केस बद्दल एका आशीलाशी चर्चा करत असतात. गावातील लोक आलेले पाहून शिवचरण, शिवचरण, “ प्रतापराव, आबा, काका तुम्ही सारे आज एकदम अचानक.”

 आबा, “ कामच तसं होतं.”

 शिवचरण, “ कोणतं काम?”

 आबा, “ एक कंपनी जबरदस्ती आमच्या परिसरात खोदकाम करत आहे. त्यांचा दांडगावा जोरात चालू आहे.”

 शिवचरण, “ हे तर, होणारच होते. मी मागं कल्पना दिली होती तुम्हाला, तेव्हा ऐकलं का नाही.”

 प्रतापराव, “ हे बघ ही अडाणी माणसं, यांना काय कळतंय? कायद्यातल. आम्हाला फक्त एवढंच हवं आहे की आमची नैसर्गिक संपत्ती वाचवायची आहे. त्यासाठी आम्हाला तुझी मदत हवी आहे.”

 शिवचरण, “ ठीक आहे करेन मी मदत.”

 प्रतापराव, “ त्यासाठी लागेल तेवढा खर्च करू. पण हे उत्खननं थांबलं पाहिजे.”

 शिवचरण, “ लोकशाहीत लोकांच्या परवानगीशिवाय कोणतीच गोष्ट करता येत नाही. मी पाहीन.”

 सर्वजण, “ठीक आहे, मी पाहिन. बाहेर जरा थांबा आपण बोलू…”

ते बाहेर थांबतात.

…… ……….. ………

क्रमशः पुढे ........



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा