मंगळवार, २६ मे, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १४

 अस्तित्व पटकथा भाग १४


अस्तित्व पटकथा भाग १४ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

मल्हारी घरी आला. वाटेत येताना मधुकर पुजारी काकांना सोडून तो वाड्यावर आला.त्याने आपली बुलेट पार्क केली. व हौदाला हात पाय धुवू लागला.

मुले त्याच्याभोवती ‘काका आला.’ असे म्हणत गोळा झाली. त्यांनी एकमेकांना खाणाखुणा केल्या.

वासवीने इशारा करुन कार्तिकला विचाराय सांगितले.

मल्हारी, “ बोला, काय हवय.”

तानाजी, “ काकी कशी आहे?”

मल्हारी, “ अरे, आता तर पाहिलेय. बघू.”

कार्तिक, “ पाहिलीय ना, मग सांग दिसाय कशी आहे ती?”

मल्हारी, (तोंडाचा चंबू करुन आकाशाकडे पाहत.) “आहे बरी.”

वासवी, “ बरी म्हणजे कशी माझ्यासारखी आहे का?”

मल्हारी, “ आहे साधारण.”

अवंतिका, “ बरी आहे, साधारण आहे. हे सोड. सांग आपल्यात कुणासारखी दिसते.

मल्हारी, “ सांगू, आपल्या सरू सारखी.”

 मुले एकदम, “काय सरू सारखी.”

येसाजी, “ मग नकार कळंव.”

मल्हारी, “ ते माझ्या हातात नाही.”

अवंतिका, “ का?”

मल्हारी, “ आई साहेबांची पसंती. मी काय बोलणार.”

येसाजी, “ हे बघ, आम्ही मोठ्या आईला समजावून सांगतो.

पण आम्हाला काकी देखणी व हुशार हवी. आई व मधल्या काकी पेक्षा. सांगून ठेवतो.”

तानाजी, “ अन् हो मला हवे ते करुन घालणारी पाहिजे.”

अवंतिका, “ अन् माझी वेणी घालणारी व गजरा विणून देणारी हवी.”

वासवी, “ तुम्हाला काकी हवी की नोकरानी.”

सर्वजण, “ अपकोज काकी.”

वासवी, “ हे बघ तुला पसंत आहे का?”

मल्हारी, “ मला कोण विचारतं.”

येसाजी, “ लग्न तू करणार आहेस. की थोरली आई.”

इतक्यात मल्हारीचे आई वडील बाहेर आले. मल्हारी पाया पडला.

आई लक्ष्मीबाई, “ औक्षवंत हो.”

लक्ष्मीबाई, “ बर मुलगी कशी वाटली.”

 मल्हारी लाजत.

लक्ष्मीबाई, “ अरे, बोल की, पसंत आहे की नाही.”

 मान डोलावून होकार सांगु लागला.

लक्ष्मीबाई, “ उगाच नंदीबैल होऊ नको. स्पष्ट सांग. हो की नाही.”

मल्हारी, “ एवढं कळत नाही तुला. पसंत आहे.”

सदाशिवराव, “ अर्धी पसंती झाली. आता तिकडून होकार आला म्हणजे झालं.”

लक्ष्मीबाई, “होकार न यायला काय झाले. माझा मल्हारी आहेच मुळी लाखात एक. बघा येते की नाही खुशखबर.”

लक्ष्मीबाई, “मग, उभारणार म्हणा बोहल्यावर.”

मल्हारी, “हो.”

 तो आत जात होता. मुले त्याच्याकडे रागाने बघत होती.

येसाजी, “मघापासून आम्हाला खुळ्यात काढत होता. अन् मोठ्या आईपुढे बघितलस ना.”

अवंतिका, “आता काका आपला राहिला नाही.”

तानाजी, “अस का?”

अवंतिका, “खुळं लावलं काकीन.”

वासवी, “म्हणजे काकी दीसायला मस्त असणार.”

….. ……….. …..

आतमध्ये जेवण खोलीत

सरस्वती, “ काय ग कशी असेल, येणारी जाऊ?”

पार्वती, “ कशी पण असेना, आपल्या हाताखाली राबणारी हवी.”

सरस्वती, “ असेल का तशी.”

पार्वती, “ नसली तरी करुन घ्यायची.”

इतक्यात ननंद अलका तिथे आली. डेर्यातील पाणी घेऊन पिऊ लागली. पिऊन झाल्यावर…

अलका, “ काय वाहिनी कसली बोलणी चालल्यात.”

सरस्वती, ( मुरका मारत) “ नाही म्हटलं, भाऊजींच आज ना उद्या होईलच. आमच्या नंदुबाईना एखादा पृथ्वीराज घोड्यावर बसून कधी घेऊन जाईल.”

अलका, “एवढं काही वय झालं नाही हा माझं. आता कुठ अठरा लागलंय.”

पार्वती, “तरी म्हंटल, एखादा घरजावई तरी करुन घेतलेला बरा.”

 अलका, “काय, घर जावई.”

सरस्वती, “ नाहीतर काय, तू तर घरातील काम करत नाहीस. सासरात कसं व्हायचं तुझं.”

अलका, “ त्याची तुम्ही काळजी करू नका. माझं मी पाहून घेईन. अन तुमच बघा. नाहीतर येणारी वाघीण असली तर तुम्ही शेळ्या कोणत्या कोंडवाड्यात जाऊन बसशीला ते बघा. माझ्या लग्नाचं बोलत्यात. निम्या वयाच्या झाल्या. यांना साध्या भाकरी भाजता येत नाहीत.”

 ती बाहेर गेली. दाराशेजारी उभा राहिली.

पार्वती, “बघितलस ना, कशी बोलते. हिला चांगला चेचणारा नवरा मिळायला पाहिजे.”

सरस्वती, “तर काय, इथ आल्यापासून नुसती मोलकरीण करुन ठेवलीय.”

 बाहेरून अलका, “मला कसला ही नवरा मिळू दे, माझं मी बघीन. तुमची कामे आटपा नाहीतर आईला सांगून गोठा झाडायला लावीन. मी म्हणून तुमच्या चुकांवर पांघरूण घालते. नाहीतर… कवाच घरातल्यांनी हाकलल्या असत्या.”

सरस्वती, “बघितलस कशी सापाच्या कानाची आहे ते.”

पार्वती, “तर काय. आटप बाई. नाहीतर काय खरं नाही. ती सरी कुठं कलमडली. देव जाणे. इथं भाकरी करायच्या हाईत.”

पार्वती, “सरे, ये सरे.”

बाहेरील खोलीतून

सरू, “ हा, आले आले.”

……… …….. ………




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा