अस्तित्व पटकथा भाग १३ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,
क्रमशः पुढे......
पाटील, “ या बसा.”
मल्हारी, श्यामभट्ट व मधुकर पुजारी सोफा सेटवर बसले.
गणपतराव, “ डोक्याला काय लागले.”
पुजारी, “ मघाशी येताना वाटेत मुलांनी विटी मारली.”
गणपतराव, “ अस होय. “
आतमध्ये डोकावत,
“ अहो, ऐकलंत का? चहा पाण्याचं काहीतरी बघा. उमा आहे ना घरात.”
शकुंतला, “ हो आलीय,”
शकुंतलाने गड्याकडून पाणी बाहेर पाठवले. उमा साडी नेसत होती. राजश्रीची आई पोहे करण्यास मदत करत होती.
उमा, “ आजी, हे काय लगेच? तू तरी सांग.”
आजी, “ मी काय पिकलं पान, माझं कोण ऐकणार.”
बाहेरील बाजूस मधुकर भटजी ओळख करून देत.
मधुकर पुजारी, “ हा आमच्या गावच्या पाटलांचा मुलगा मल्हारी, बी.ए. सी. अँग्रीकल्चर आहे. भरपूर शेती आहे. त्यात नवनवीन प्रयोग करत असतो. याला दोन मोठे भाऊ विवाहित आहेत. मागे मंदिरात तुमच्या मुलीस पहिली. तेव्हा श्याम भट्टांकडे बोललो होतो.”
गणपतराव, “ हो बोलले होते शाम भट्ट मला. मला ही एक मुलगा व एक मुलगी आहे.”
गणपतराव, ( पत्नीस) : नाष्टा पाण्याचं काही बघताय की नाही.”
शकुंतला, “ हो झालंच.”
गड्याकडून शकुंतला नाष्टा लावून देते. उमा साडी नेसून तयार झाली.
आजी, “ बघू कशी दिसते.”
मायेने बोटे कपाळी नेऊन मोडली.
उमा, “ जड झालो व्हय, लगेच लग्नाचं बघायला.”
शकुंतला, “ मग काय बियाण्याला कनुगल्यात ठेवायची. उपवर मुलीचे हात पिवळे झालेले बरे.”
उमा चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. चहा देताना मल्हारीने ओळखले. ती चहा खाली मान घालून देऊ लागली. व दिल्यावर तिने वर पाहिले. ती दचकली, काळजात धस्स झालं. मल्हारी मात्र तिला पाहतच होता.
मधुकर भट्ट, सावध करत.
“ काय मल्हारी, बघून घे, मुलगी पसंत आहे का बघ.”
मल्हारीने हसून चहा घेतला. भटजी बुवांनी उमाला औपचारिका प्रश्न विचारले.
“ बाळ नाव काय?“
“ उमा गणपतराव पाटील.”
“ शिक्षण “
“ H.s.c. सायन्स.”
“ छंद “
ती काही बोलत नाही.
आजी, “ तिला सर्व काही येते. जेवण, घरकाम, वगैरे ती सर्व करते. दारातील रांगोळी देखील तिनेच काढली आहे.”
मधुकर पुजारी, “ बरं.”
श्याम भट्ट, “ मल्हारी काय विचारणार आहेस का?”
मल्हारी, “ नाही, नको.”
( त्याने तिच्याकडे पाहून स्माईल केले. उमा शांत होती. तिच्या मनात धाकधूक होती. अनेक प्रश्न मनात येत होते.”
उमा ( मनात ) : “ त्याने मला पाहिलं तर नसेल ना. माझी तक्रार तर करणार नाही ना? दिसावयास छान आहे. पण स्वभाव कसा असेल? देव जाणे. मला पसंत करेल का? नक्कीच नाही, कारण मी विटी मारली ना? अरेरे, बिचाऱ्याच्या डोक्याला लागलं. रक्त किती ओघळले असेल. तरी पण हा शांत कसा? याने मला पाहिलं ना? मग तक्रार कशी करत नाही. हा घरी आहे ना आमच्या. सांगेल नंतर नकार. खरंच का मला नकार देईल? की होकार. बापरे, देवा तूच मला वाचव या संकटातून.”
श्याम भट्ट, “ बर, बाळ जा आत.”
उमा ने वाकून नमस्कार केला. व आत गेली. परसदारी असणारी मुले खिडकीतून वाकून पाहून परसदारी आली. चर्चा करुन त्यांनी चिठ्ठी लिहिली.
थोड्या वेळाने मधुकर भट्ट, श्याम भट्ट व मल्हारी बाहेर पडले.
गणपतराव, “ बरं काय ते निरोप कळवा.”
मधुकर पुजारी, “हा कळवतो.”
मल्हारी वाडा, रांगोळी, परिसर पहात जात होता. एक मुलगा बोळातून आला. व मल्हारीस चिठ्ठी देऊन गेला. व सॉरी म्हणाला. मल्हारीने ती चिठ्ठी घेतली. व वाचू लागला. त्यात लिहिले होते.
मल्हारीने चिठ्ठी उघडून पहिली. त्यात खालील मजकूर होता.
“ आमची उमाताई खूप चांगली हाय. आम्हाला ती विटी मारायला शिकवत होती. तेव्हा ती विटी लागली. माफ करा. ती खूप चांगली आहे. आम्हाला चिंचा देते. आंबे काढून देते. आमचा अभ्यास घेते. पुरणपोळ्या छान बनवते. तुम्ही पाडव्याला या. आम्ही मस्त पुरणपोळ्या वाढू….. तुमचा गुन्हेगार म्हाद्या”
मल्हारी हसला. त्याने ती चिठ्ठी खिशात घातली. व निघाला. वाटेत जाताना गाडीवर
मधुकर पुजारी , “ काय मल्हारी, मुलगी पसंत आहे का?”
मल्हारीने होकारार्थी मान हलवली.
मधुकर पुजारी, “ शाम भट्ट मुलाला मुलगी पसंत आहे. मुलीकडच्या लोकांनाही विचारून घ्या. मग बघू पुढच.”
श्याम भट्ट, “चालेल, विचारतो त्यांना. देईन निरोप नंतर.”
मधुकर पुजारी, “चालेल. निघतो आम्ही.”
ते निघाले.
….. ….. …
मुलगा पाहून गेल्यावर उमाने सुटकेचा सुस्कारा टाकला. पाटीमागे घराच्या मुलांची कुजबुज चालू होती.
शकुंतला आत आल्यावर
“ मला तर बाई मुलगा पसंत आहे.”
आजी, “ तुला असून काय करायचे? तिला आहे का बघ. तूला नांदायला जायचं आहे थोडंच?”
शकुंतला ने इशारा केला. उमा कावरी बावरी झाली. तिला काही सुचत नव्हते. ती काहीच बोलली नाही. इतक्यात गणपतराव आत आले.
गणपतराव, “ मला तर मुलगा बरा वाटला. अगदी राजबिंडा आहे. अन् कष्टाळू ही आहे.”
आजी, “ पण त्याला पसंत आहे का? हे कळायला हवं.”
गणपतराव, “ पसंत असेल, असं मला तरी वाटतं. त्याच्या चेहऱ्यावरून जाणवलं.”
शकुंतला, “ उमाला पसंत आहे का विचारा.”
आजी, “ काय ग, तुला पसंत आहे का?”
उमा विचारात असते. तिला हलवत.
उमा, “ ह.. हो आ…”
आजी, “ ह. हो. आ… काय? पसंत आहे का?”
उमा, “ त्याला पसंत आहे का? हे आधी विचारा.”
आजी, “ तुझं काय ते सांग?”
शकुंतला, “ एवढं चांगलं स्थळ पुन्हा मिळेल का?”
उमा, “ आधी तिकडून येऊ दे निरोप मग बघू.”
बाहेर मुलांचा गोंगाट चालू होता.
शकुंतला, “ उमा, त्या भांड्यात पोहे आहेत. दे जा त्या मुलांना एक एक घास. कारवानं नुसती काल काल करताहेत.”
उमा ने उठून भांड्यातील पोहे एका पितळीत घेतले. व बाहेर गेली व मुलांना वाटू लागली. मुले ‘मला दे, मला दे’ असा दंगा करू लागली.
उमा, “अरे, दंगा करु नका. ओळ करा सर्वांना देते.”
पोहे घेतल्यावर. महादू तिच्या जवळ गेला.
महादू, “उमक्का काळजी करु नकोस. दाजी होकार देतील.”
उमा, “ ए म्हसोबा, गप्प, अजून कशात काय, अन् फाटक्यात पाय. उगाच लगेच नाती जोडू नकोस. मला तर तो नकारच देईल असं वाटतंय.”
महादू, “ गप्प बस, बघ होकार येतो. की नाही. मी चिट्टी दिलेय दाजीला. फडतळातून कागद अन् शाई घेऊन.”
उमा, “काय, चिठ्ठी, आई गं, मेलो आता. काय लिहिलंस त्यात.”
महादू, काही नाही ग, फक्तं एवढंच लिहिलं. आमची उमाक्का लई चांगली हाय. अन् चुकून इटी लागली. माफ करा. म्हणून..”
उमा, “ एवढं सगळं लिहिलंस.”
इतक्यात मागील श्रीपती, “ एवढंच नाही. तर पाडव्याला या म्हणालाय. पुरणपोळी खायला.”
उमा, “ अरे, माझ्या कर्मा, तू तर पुरावाच दिलास की हातात. आता सगळ अंगलट येणार.”
महादू, “ गप, येईल निरोप.”
इतक्यात गडी बाहेरुन आला.
गडी, “ मालक, मालक, श्यामभट्टानी सांगावा दिलाय.”
गणपतराव, “ काय म्हणाले?”
गडी, “ मुलग्याला मुलगी पसंत आहे म्हणाले.”
गणपतराव, “ वा, खूप आनंदाची बातमी दिलीस.”
पाळण्यावर बसून झोके देत.
गणपतराव, “ अहो, ऐकलंत का?”
शकुंतला, “ काय ते?”
गणपतराव, “ मुलाला मुलगी पसंत आली.”
शकुंतला, “ देव पावला म्हणायचा.”
गणपतराव, “ लाडू वळायला घ्या आता.”
शकुंतला, “ ते तर झालंच. पण आपणही त्याचं घर पहायला हवं.”
गणपतराव, “ ते तर होईलच हो.”
शकुंतला, “ उमा, ये उमा.”
उमा, “ ओ.. , आले.आले.”
शकुंतला, “ आले काय आले. होकार आलाय तिकडच्या स्वारींचा. आता तुझं काय ते सांग.”
उमा, “ काय लगेच.”
शकुंतला, “लगेच काय लगेच. मग काय महिना लावायला पाहिजे होता.”
उमा, “तस नाही.”
शकुंतला, “ तस वस काय नाही. गुमान हो म्हण. आणि उभी रहा बोहल्यावर.”
मुले, ( ओरडत) “ ऐ..उमा ताईच् लगीन ठरलं.”
उमाच्या हातातील पोह्यांची पितळी हिसकावून घेऊन नाचू लागले.
उमा,( मनात) “मला लगेच कशी पसंत केली याने. मी एवढी विटी मारुन देखिल.”
ती विचार करु लागली.
……… …………………
क्रमशः पुढे.......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा