गुरुवार, २ एप्रिल, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ५

 अस्तित्व पटकथा भाग ५


संध्याकाळ झाली, जगन त्याच्या गुंगीतून बाहेर आला. त्याचे डोके जड झाले होते. त्याच्या आईने त्याला चहा दिला.

जगन , “ आई गं.”

आई, “ काय झालं बाळ.”

जगन, “ डोक दुखतंय.”

आई, “ दुखणारच. तू काय खाल्लस.”

जगन, “ प्रसादाचा शिराच खाल्ला , पण जरा चव वेगळी होती.”

आई, “ त्या पोरींनीच काहीतरी घातलं असणार. त्या पोरींपासून लांब रहात जा हो.”

बाबा, “ उगाच लोकांच्या पोरींना कशाला बोलतेस, यान चोरुन शीरा खाल्ला. आंबे चोरले. तसेच कुठून तरी ढोसली असेल. व घालतोय त्या पोरींच्या नावावर.”

जगन, “ बा, तुला म्या कितीही ओरडून सांगितलं तरी पटायचं नाय.”

बाबा, “ पटेल कसं, सगळं समोर दिसतंय.”

( जगन रागाने उठून गेला.)

 आई, “ आर, जगन्या जेवून तरी जा.”

जगन, “घाल, तुझ्याच नवऱ्याला.”

बाबा, “ जाऊ देत, पोटात कावळे ओरडायला लागले की येईल परत.”

….. …… ….. ….. …..

 जगनला उमा व तिच्या मैत्रिणींचा राग आला. त्यांच्या कारस्थानात आपण सापडलो यामुळे तो खूप चिडला होता. त्याने त्यांना अद्दल घडवण्याचे ठरवले होते. त्याने आपले मित्र प्रल्हाद व मोहन यांच्या मदतीने सकाळी रानात जाऊन कावशीची वेल शोधून त्यावरील कावशी पळस पानात घेतली. व आला. शाळेत सगळ्यांच्या आधी जाऊन त्याने त्या मुलींच्या जागेवर कावशीचे तंतू टाकले. व बाहेर खेळायला गेला.

उमा व तिच्या मैत्रिणी शाळेत आल्या. आपल्या जागेवर दप्तर ठेवले. व प्रार्थनेला गेल्या. प्रार्थना झाली. त्या वर्गात आल्या. तासिका सुरु झाली. घाटपांडे सर आले होते. त्यांनी हजेरी घेण्यास सुरवात केली.

घाटपांडे सर, “चला हजेरी द्या.”

 मुले शांत बसली.

घाटपांडे सर, “ सचिन पाटील, “

सचिन , “येस सर.”

“ उमा पाटील, जयश्री गायकवाड, लता कुंभार, जगन मोरस्कर.”

जगन , “ येस सर.”

 जगन चे नाव घेताच सर जगनला म्हणाले,

“काय जगन कालची उतरली की नाही. जरा शाळेत नीट वागत जा.”

जगन खाली मान घालून उभा होता. सर्व मुले हसत होती. मुली पण हसत होत्या. उमेला हसताना पाहून, जगन मनात,

“ मला हसताय काय? कळेल थोड्या वेळात, चांगल्या रडशीला.”

सर, “ चला आज आपण मराठीचा पाठ पाहणार आहोत. गुळ हरियाचा सिद्धांत, ही एक लीळाचरित्रातील लीळा आहे. ज्यामध्ये …..”

थोड्या वेळाने मुलींना खाजवायला सुरुवात होते. त्या एकमेकींकडे पाहत इशारे करू लागल्या. जगन शांत बसलेला होता. राजश्रीला सहन होत नव्हते. ती खाजवत उठली.

राजश्री, “ आई गं, खूप खाजवतेय. सर कुणीतरी खुजली टाकलेय बघा.”

लता, “ सर, खरंच कुणीतरी टाकलेय, सगळ्या अंगाला खाज सुटलीया.”

 सरांची परवानगी काढून त्या खाजवतच वर्गातून बाहेर पडल्या. व घरच्या वाटेला लागल्या. खाज खूप सुटली होती. वाटेत जाताना.

प्रभा, “ आई गं, मेलो मेलो.”

लता, “ कुणी टाकली असल गं.”

उमा, “ दुसर कोण, वर्गात किडा एकच.”

 जया, “ कोण जगन्या.”

हेमा, “ नाहीतर काय मुळावरच आलाय मुडदा आमच्या.”

लता, “जगन्या सोडणार नाय तुला.”

जयश्री, “ आता काय करूया गं, लईच खाजवतंय.”

लता, “चला, मांगीर बाबाकडं तोच दिल झाडपाल्याचं औषधं.”

त्या गावातील वैद्याकडे गेल्या. वैद्यबुवा पडवीत विश्रांती घेत होते. तिथे गेल्यावर.

प्रभा, “वैद्यबुवा कायतरी द्या आम्हाला वाचवा. नाहीतर आम्ही मेलाव बघा.”

लता, “एवढ बरं करा. बेंदराला बैलं फुकट देईन.”

वैद्य बुवा, “एवढं झालंय तरी काय?”

उमा, “ खुजली झालेय. खाजवतंय खूप. मला वाटतं कुणीतरी कावशी घातलेय.”

वैद्यबुवा, “एवढंच ना, थांबा देतो औषध.”

( वैद्य बुवांकडील औषधं घेऊन त्या मागील गोठ्यात गेल्या. त्या औषधाचा घाण वास येत होता. ते त्यांनी नाक धरून अंगाला लावले. थोड्या वेळात खुजली थांबली. बरे वाटू लागले.)

उमा, “त्या जगण्याला आता बघतोच बघ.”

प्रभा, “तर काय? “

राजश्री,

 “ अगं, पण त्यानेच केलं कशावरून.”

लता, “ एवढ, धाडस हाय कुणात, त्या बीन घाट्याच्यातच ना.”

दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यावर जगन व त्याचे मित्र अजिंक्य व इतर सर्वजण मुलींना चिडवत होते.

जगन, “ काय अजिंक्य माकड कसं खाजवत.”

इतर मुले, “ खार, खार , खार खार.”

जगन, “ वावा.. ,वावा… ,”

उमा त्यांकडे रागाने पाहते. तेव्हा लता तिचा हात धरून शांत होण्यास सांगते.

लता, “ गप चल, इथं तमाशा नको. बघू काय करायचं ते.”

त्या वर्गात गेल्या.

…….. ……. …….


रविवार होता. सुट्टीचा दिवस गावाबाहेर माळावर मुले क्रिकेट खेळत होती. जगन व त्याचे मित्र देखील होते. माळावर बाजूच्या रानात सुकत घातलेले अंथरुण न्यायला लता व उमा आल्या होत्या. त्या दोघींनी त्यांकडे पाहिले. तेथील झाडावर मधाची पोळी होती.

उमा, “लता काय करायचं ग.”

 लता, “ द्यायचा दणका.”

उमा, “ पण आपण लपायचं कुठं ग.”

लता, “ते बघ जानू धनगराचं घोंगड वाळत घातलय त्यात.”

 उमा, “ मग दे की दणका.”

 लता, “ माझा नेम तुझ्या इतका बेस्ट नाही.”

 उमा दगड उचलून

“ मग घे.”

 तिने दगड मारला. व त्या पळत जाऊन घोंगडीत लपल्या. मव्हाच्या माशा मुलांच्या मागे लागल्या. चावू लागल्या. पोर सैरावरा पळू लागली. एकेकाचे तोंड सुजले. थोड्या वेळाने माशा शांत झाल्या. त्या घोंगडीतून बाहेर आल्या. बऱ्याच जणांना डॉक्टरकडे नेले. हे जेव्हा उमा व लताला कळले. तेव्हा त्या घाबरल्या. व देवाजवळ प्रार्थना करू लागल्या. ती मुले वाचलीत. इथून पुढे कुरघोडीचा डाव न करण्याचे त्यांनी ठरवले.

……….. ….. …….

क्रमशः पुढे.....










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा