रविवार, २६ एप्रिल, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १०

अस्तित्व पटकथा भाग १० अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,


क्रमशः पुढे...... चालू 

 सोमवार उमेच्या गावातील शिव मंदिर उमा देवास आली. देवपूजा केली. पुजाऱ्याच्या मुलाने नैवेद्य दाखवला. गावातील शाम भट्ट पुजारी व मधुकर पुजारी मंदिराच्या बाहेर बोलत बसले होते. उमा पूजा आटोपून घरी जाताना नमस्कार करून निघून गेली.

मधुकर पुजारी, “ किती संस्कारी मुलगी आहे.”

शाम भट्ट, “ हो उमा आहेच गुणी अन् संस्कारी व सुशिक्षित ही.”

मधुकर पुजारी, “ कोणाची आहे मुलगी?”

शाम भट्ट, “ गावच्या गणपत पाटलांची. सर्व व्यवहारात हुशार व गुणी आहे लहानपणी आई वारली, तिच्या मावशीने सावत्र आई होऊन सांभाळ केला.”

मधुकर पुजारी, “ तिची कुंडली मिळेल का?”

शाम भट्ट, “ हो, आहे माझ्याकडे मीच काढली होती. परवा तिचा बाप आला होता. स्थळ शोधताहेत. आहे का कोण मुलगा नजरेत.”

 मधुकर पुजारी, “ हो आहे, आमच्या इथल्या पाटलांचा मुलगा. मल्हारी त्याच्या लग्नाचं चाललंय बघायचं.”

 शाम भट्ट, “मुलगा जर चांगला असेल तर सांगा, मी घालेन पाटलांच्या कानावर.”

 मधुकर पुजारी, “ आधी विचारुन पाहतो. तुम्ही पण घाला कानावर. देवाची मर्जी असेल तर जमेल कल्याणी बंधन.”

“बर येतो आता. खूप उशीर होईल. राम राम.”

शाम भट्ट, “राम राम.”

( पुजारी निघून गेले.)

…. …… …….

सुर्यगाव पाटीलवाडा मल्हारीच्या घरी

लक्ष्मीबाई शांत वाड्यात पाळण्यावर ओसरीत बसलेली शांत विचार करत, सदाशिवराव येऊन

सदाशिवराव, “ कसला एवढा विचार करताय?”

लक्ष्मीबाई, “ आणखी कसला, मल्हारीचा?”

सदाशिवराव, “ त्याचा काय एवढा विचार करताय?”

लक्ष्मीबाई, “ लग्नाचं बघायला नको का त्याच्या.”

सदाशिवराव, “ येताहेत ना स्थळ त्याला, बघू एखादं.”

लक्ष्मीबाई, “ ते ही काड्या टाकून कोणतरी मोडतंय.”

सदाशिवराव, “ काळजी करु नकोस. मी बोलावलेय मधुकर भट्टांना?”

( वाड्यात मधुकर पुजारी आले. ओसरीत शिवाण्णा गडी नारळ सोलत होता. आल्यावर.)

शिवण्णा, “ राम राम पुजारी बुवा. “

पुजारी, “ राम राम….”

वाड्यात बाहेर असलेल्या हौदजवळ आपले हात पाय धुवून आत ओसरीवर आले. आल्यावर

पाटील सदाशिवराव, “ या पुजारी बुवा, आत्ताच आठवण काढली होती.”

 पुजारी, “ राम राम. “

पाटील, “ या बसा.”

पुजारी बसल्यावर.

 लक्ष्मीबाई, “ सरला ये सरला, गुळ पाणी आण.”

नोकरांनी पाणी घेऊन आली. तिने गुळ पाणी दिले.

लक्ष्मीबाई, “ जरा चहापानाचं बघा म्हणावं.”

नोकरांनी, “ जी .”

 ती आतमध्ये गेली.

……… ……..,

सदाशिवराव, “ काय म्हणताय, बाकी मजेत ना,”

मधुकर पुजारी, “ काळभैरीच्यि कृपेने सर्व ठीक आहे. “

( आपल्या जवळील पिशवीत हात घालत.)

पुजारी, “ आपण मागे बोलला होतात. स्थळाबद्दल. माझ्या नजरेत एक स्थळ आहे. शाम भट्टांकडे परवा गेलो होतो. तिथे असगावात गणपतराव पाटलांची एक मुलगी आहे. उमा, खूप सुशील व गुणी आहे. मी म्हणतो, मल्हारीस दाखवली तर. हा फोटो व कुंडली.”

लक्ष्मीबाई, “त्यात काय विचारायचं, दाखवा की, त्याला पसंत पडली म्हणजे झालं …”

( सदाशिवराव व लक्ष्मीबाई फोटो पाहतात.)

पुजारी, “ मी कुंडली सुद्धा जुळवून पाहिलीय. ३६ पैकी ३४ गुण जुळतात बघा. अगदी शिव पार्वतीचा जोडा शोभेल हो.”

सदाशिवराव, “चालेल की बघा.”

( त्याचवेळी मल्हारी बाहेरून आला. हात पाय बाहेर हौदला धूत असताना चपला बाहेरील पाहून शिवण्णास.)

मल्हारी, “कोण आलंय.”

शिवण्णा, “ पुजारी काका आलेत स्थळ घेऊन.”

( हाताची पिपाणी सारखी ऍक्शन करत. पी पी पी…. करायला.)

(मल्हारी हात पाय धुवून चोर पावलांनी आपल्या खोलीकडे जाताना लक्ष्मीबाईंना दिसला. त्यानी सदाशिवरावांना इशारा केला.)

 सदाशिवराव, “मल्हारी.”

मल्हारी झटकन वळला.

मल्हारी, “ काय, अण्णा.”

सदाशिवराव, “काही नाही तुला एक स्थळ आलेय.”

मल्हारी, “बर.”

सदाशिवराव, “ तुझं मत काय?”

मल्हारी, “तुम्ही म्हणाल तसे.”

सदाशिवराव, “ पोरगी जरा सावळी आहे. पण बरी आहे.”

लक्ष्मीबाई, “ आता शेतकऱ्याला कोण मुलगी देतयं. चालायचंच, जरा चकणी आहे. पण चालेल.”

सदाशिवरावानी पुजाऱ्यांना इशारा केला.

पुजारी हसत, “ अहो शेतकरी म्हंटल्यावर कोण शिकलेली मुलगी देत का?”

लक्ष्मीबाई, “ आमची काही हरकत नाही. पण वरास दाखवा एकदा. मुलगी सुशील असली म्हणजे झालं.”

मल्हारी शांतपणे पुढ्यात उभा होता.

मधुकर पुजारी, “ आ…उद्या.. नको परवाच जाऊ, चांगला दिवस आहे, पुष्य नक्षत्र आहे तेव्हा. चालेल , परवा बघा. तुमची हरकत नसेल तर.”

सदाशिवराव, “ चालेल की. “

“ तुझी काही हरकत नाही ना. तुझं काय मत यावर.”

मल्हारी, “ परवा जरा शेतावर काम होतं.”

 लक्ष्मीबाई, “ ते काम बीम राहु दे , बघतील दुसरी. परवा तू तयार व्हायचं. अन् सुटायचं, पुजारी बुवांना घेऊन समजलं काय?”

इतक्यात सरला चहा घेऊन आली.

लक्ष्मीबाई, “ घ्या, पुजारी बुवा.”

 पुजारी चहा घेऊ लागले.

…… …… ……

संध्याकाळी मल्हारी आरशा समोर आपली केस विचरत होता. तिथून जवळील खोलीत वाहिनी तांदूळ सुपात घेताना.

सरस्वती, “ काय पण नटन हे. देखणेपणा असून काय उपयोग.”

पार्वती, “शेवटी कोळशाची खानचं पदरात पडायची.”

सरस्वती, “गोरी बायको मिळायला पण भाग्य लागतं.”

पार्वती, “शेवटी काय करेल बिचारा, आईच्या ताटाखालचं मांजर. आई म्हणेल तसंच वागणार. “

सरस्वती, “ शेवटी काय नशीबच फुटकं, काय करणार.”

त्या हसू लागल्या.

……. ……… …….


क्रमशः पुढे.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा